धुळे(खा.स.वृत्तसेवा) :
३६६ वा शिवप्रताप दिन साजरा करण्याच्या निमित्ताने धुळे शहरातील D-Mart समोर असणाऱ्या १८व्या शतकातील इंग्रजकालीन ऐतिहासिक धर्मशाळेत किल्ले लळींग संवर्धन समितीतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
काळाच्या ओघात झिजत चाललेली ही वास्तू आता शेवटच्या घटका मोजत असली तरीही तिचा इतिहास जपण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे.

या धर्मशाळेवर कोरलेल्या शिलालेखाचे वाचन सतीशिळा व विरगळ अभ्यासक अनिल दादा दुधाने यांनी केले. त्या शिलालेखावर खालील मजकूर कोरलेला आहे –

  1. श्री धर्मशाळा
  2. ठकूबाई मुर्दजावन चौ
  3. धरी धुळेकर शके १८०१
  4. मध्ये बांधले, जीर्णोद्धार
  5. किसन जावन बाळा चौधरी
  6. शके १८५१ मध्ये केले

या शिलालेखावरून असे दिसते की ही धर्मशाळा धुळेतील एका व्यापाऱ्याने त्या काळातील रयतेसाठी बांधली असावी. पूर्वी धर्मशाळांचा मुख्य उद्देश प्रवासी आणि यात्रेकरूंना निवारा व विश्रांती देणे हा होता. तसेच धार्मिक, सामाजिक आणि अध्यात्मिक कार्यांसाठीही अशा जागांचा वापर केला जात असे. काही ठिकाणी धर्मशाळांमधून गरजूंसाठी अन्नदान, आरोग्यसेवा आणि सामाजिक उपक्रमही चालवले जात असत.

इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देणाऱ्या या वास्तूंचे संवर्धन करणे आजच्या पिढीची जबाबदारी आहे. कारण या इमारती आपल्याला भूतकाळातील जीवनशैली, समाजरचना आणि दातृत्वाचे दर्शन घडवतात. आज देशभरातील अनेक धर्मशाळा वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आलेल्या आहेत; त्याच धर्तीवर धुळेतील ही धर्मशाळाही जपली जाणे आवश्यक आहे.

या स्वच्छता मोहिमेत किल्ले लळींग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे, सचिव महेश बागुल, तसेच भटू वाघ, राहुल सूर्यवंशी, कमलेश गोसावी, संदीप परदेशी यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
या मोहिमेत शिलालेखाच्या वाचनासाठी अनिल दुधाने यांचे मोलाचे योगदान लाभले, तसेच होळकरशाही अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी या संदर्भात मौल्यवान मार्गदर्शन केले.

धुळेकरांच्या इतिहासाशी निगडित ही वास्तू जतन करण्याची जबाबदारी सर्व धुळेकरांची असून, या मोहिमेद्वारे किल्ले लळींग संवर्धन समितीने जतनाची पहिली पायरी टाकली आहे.


🖋 लेखन : प्रशांत खेमनार
अध्यक्ष – किल्ले लळींग संवर्धन समिती, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *